अकोट बाजार समितीत भुईमूग खरेदी ठप्प
By Admin | Updated: May 24, 2017 01:20 IST2017-05-24T01:20:48+5:302017-05-24T01:20:48+5:30
अकोट: अकोट बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगाला कमी दर मिळत असल्याने २३ मे रोजी शेतकरी संतप्त झाले होते.

अकोट बाजार समितीत भुईमूग खरेदी ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगाला कमी दर मिळत असल्याने २३ मे रोजी शेतकरी संतप्त झाले होते. परिणामी कमी दरात भुईमूग विक्री करण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्याने खरेदी ठप्प पडली होती. दरम्यान, बाजार समिती सचिवांना भेटून शेतकऱ्यांनी कमी दर मिळत असल्याची तक्रार करीत रोष व्यक्त केला.
अकोट बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक झाली आहे. बाजार समितीच्या आवारात भुईमुगाचे ढीग पडले आहेत. शासनाने भुईमूग शेंगाला ४,२२० एवढा हमीभाव ठरविला आहे; परंतु व्यापारी २,२०० ते ३,००० रुपये दराने भुईमुगाला भाव देत आहेत. दुसरीकडे इतर बाजारपेठेत मात्र ४,००० रुपयांच्या वर भुईमूग खरेदी सुरू आहे; परंतु मध्येच कमी दराने खरेदी केल्या जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांच्या दालनात जाऊन याबाबत तक्रार केली. भुईमूग लागवडीकरिता लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. अशातच कमी दराने व्यापारी भुईमूग मागत असल्याने शेतकऱ्यांनी आज विक्रीस नकार दिला आहे. शेतकऱ्यांना कमी दर देऊन वेठीस पकडल्या जात असल्याने बाजार समिती सचिवांची भेट घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी खरेदी दरासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, योग्य दर मिळत नसल्याने आज हरासीमध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला नसल्यामुळे बाजार समितीच्या आवारात भुईमुगाचे ढीग दिसून येत आहेत.
भुईमुगाच्या दराबाबत व्यापाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.
- राजकुमार माळवे, सचिव, कृउबास, अकोट