भुईमूग उन्हाळी हंगामातील फायदेशीर पीक - डॉ. मानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:47+5:302021-03-27T04:18:47+5:30
अकोला : उन्हाळी हंगामात शाश्वत व भरपूर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून भुईमूग पिकास शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. विद्यापीठाच्या ...

भुईमूग उन्हाळी हंगामातील फायदेशीर पीक - डॉ. मानकर
अकोला : उन्हाळी हंगामात शाश्वत व भरपूर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून भुईमूग पिकास शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची लागवड होणे गरजेचे आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या लागवड तंत्राचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी केले.
विस्तार शिक्षण संचालनालय डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत ‘एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान’ या प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी भुईमूग शेतीदिन कार्यक्रम २३ मार्च रोजी प्रगतिशील शेतकरी संदीप वाघमारे कानशिवनी (ता. अकोला) यांच्या शेतात सामाजिक अंतराचे पालन करून पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर तर अध्यक्ष म्हणून कानशिवणीचे सरपंच सुमित तवाळे उपस्थित होते. प्रमुख अतिथीमध्ये वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ तेलबिया डॉ. एस. जे. गहुकर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. इसाळ, तेलबिया पैदासकार डॉ. एन. वाय. लाडोळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. एन. माने, कृषीविद्यावेत्ता डॉ. बी. के. फरकाडे, प्रगतिशील शेतकरी देवानंद वाघमारे तसेच कानशिवनी, सुकळी शिवारातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विद्यापीठनिर्मित नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन सरपंच तवाळे यांनी केले. डॉ. गहूकर यांनी भुईमुगामध्ये प्रक्रिया उद्योगातून मूल्यवर्धन केल्यास आर्थिक मिळकतीस चांगला वाव असल्याचे उदाहरणांसह पटवून दिले.
प्रास्ताविक डॉ. आर. एल. इसाळ यांनी केले. तसेच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. आर. एल. इसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहायक अर्चना चव्हाण, कनिष्ठ संशोधन सहायक आर. बी. धुरतकर, योगेश मानकर यांनी परिश्रम घेतले.