भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ग्रामसेवकाला पुन्हा ‘त्याच’ जागेवर नियुक्ती
By Admin | Updated: August 7, 2014 22:52 IST2014-08-07T21:47:38+5:302014-08-07T22:52:45+5:30
यापूर्वी पाच वेळा झाले होते निलंबित

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ग्रामसेवकाला पुन्हा ‘त्याच’ जागेवर नियुक्ती
अकोला- दलित वस्तीच्या कामात अनियमितता केल्याचा आरोप असलेले आणि यापूर्वी पाच वेळा वेगवेगळ्य़ा कारणांसाठी निलंबित झालेल्या ग्रामसेवकावर जिल्हा परिषद प्रशासनाच्या कृपेने भ्रष्टाचार केलेल्या ग्रामपंचयातमध्येच नियुक्ती देण्यात आली.
भ्रष्टाचाराच्या आरोपात पाच वेळा निलंबित झालेले ग्रामसेवक के.पी. वाघ यांच्यावर २0११-१२ मध्ये गोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना दलित वस्तीच्या कामात १ लाख ३ हजार ५00 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही वाघ यांना अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी गोरेगाव ग्रामपंचायतचा प्रभार दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रारही केली आहे. स्थायी समिती सभेतही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. असे असतानाही वाघ यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या एका नातेवाईकाकडेच पंचायत विभागात ग्रामसेवकांच्या आस्थापनेचा प्रभार होता.
** ६0 पानांचा निलंबनाचा प्रस्ताव
गोरेगाव खु., गोरेगाव बु., माझोड, येवता, येळवण, नैराट, वैराट, रोहणा, काटीपाटी, सोनाळा आदी ग्रामपंचायतींमध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात ग्रामसेवक वाघ यांनी अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबत १३ जून २0१४ रोजी ६0 पानांचा निलंबनाचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी होणे अपेक्षित होते; मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या मेहेरबानीमुळे ते कार्यरत असून, ज्या ग्रामपंचायतमध्ये अपहार केला तेथेच त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.