तर ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणार नाही!
By Admin | Updated: March 27, 2015 01:23 IST2015-03-27T01:23:52+5:302015-03-27T01:23:52+5:30
राज्य तहसीलदार संघटनेचा इशारा.

तर ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणार नाही!
अकोला: मागील ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचे थकीत अनुदान देण्यात यावे, तसेच या निवडणुकीच्या खर्चाचा अग्रिम निधी देण्यात यावा, अन्यथा ३0 मार्च रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार नाही, असा इशारा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला. मे ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम २४ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर केला असून २२ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. सन १९९८ पासून मागील ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चाची थकीत रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. त्यामुळे हा प्रलंबित निधी तसेच यावेळी होत असलेल्या निवडणुकांसाठी संघटनेने मागणी केलेल्या निवडणूक खर्चाच्या अनुदानाची अग्रिम रक्कम प्राप्त झाल्याशिवाय निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार नाही. नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च उधारीवर भागविणे यावेळी शक्य नाही, असे राज्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांचे मत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*मतदान केंद्रनिहाय १0 हजारांचा अग्रिम द्या!
राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय १0 हजार रुपये अग्रिम निधी देण्यात यावा, अशी मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनात करण्यात आली आहे.