ग्रामपंचायत निवडणूक झाली पण कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:11+5:302021-02-05T06:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी आणखी २९ लाख ७० हजार रुपयांचा निधी ...

ग्रामपंचायत निवडणूक झाली पण कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षाच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी आणखी २९ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनामार्फत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. हा उपलब्ध निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरीत करण्यात आला. त्यानंतर निवडणूकही पार पडली. मात्र, या निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप मानधनाची प्रतीक्षाच आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील मुदत संपलेल्या २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दहा ग्रामपंचायती बिनविराेध झाल्याने २१४ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेप्रमाणे शासनाकडून निधी देण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षित हाेते. त्यापैकी ३६ लाख रुपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत यापूर्वी प्राप्त झाला होता. त्यानंतर आणखी २९ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. हा उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक मागणीच्या तुलनेत १३ जानेवारीपर्यंत ६५ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला, तरी उर्वरित ४४ लाख ६ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानधन देणे शक्य झालेले नाही.
.............
२०१७चे मानधनही प्रलंबितच
जिल्ह्यात यापूर्वी २०१७मध्येही मुदत संपलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठीही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आता या निवडणूक प्रक्रियेला तीन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांचे मानधन अद्यापही मिळालेले नाही, तर मानधन मिळालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांहून अधिक काळ यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.
............
जेमतेम हजार रुपये मानधन
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडली जाते. यात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून रितसर प्रशिक्षण दिले जाते. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागतो. शिवाय निवडणूक प्रक्रियेत मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन ताब्यात घेऊन हजर राहावे लागते. या सर्व प्रक्रियेसाठी प्रशिक्षणासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेमतेम हजार रुपये मानधन मिळते.
.............
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत ३६ लाख ३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी तहसील स्तरावर पाठविण्यात आला आहे. उर्वरित निधीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यातूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन अदा केले जाणार आहे. उर्वरित निधी मिळताच तो तहसील स्तरावर वर्ग केला जाईल.
-संजय खडसे
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी