GPS system for Akola municipal corpration's Ghanta Gadi | मनपाच्या घंटागाडीला ‘जीपीएस’प्रणाली

मनपाच्या घंटागाडीला ‘जीपीएस’प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे नोंद ठेवण्यात कसूर करणाºया मोटर वाहन विभागाच्या भोंगळ कारभाराला आणि वाहन चालकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घंटागाड्यांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या घंटागाड्या बेपत्ता व बेवारस स्थितीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटल्यानंतर आयुक्तांनी तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपताच ‘जीपीएस’ची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अकोलेकरांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १२५ घंटागाडीची सोय केली आहे. या वाहनाद्वारे शहरातील हॉस्पिटल, हॉटेल, खानावळी, दुकाने, बाजारपेठेतून कचरा जमा करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मनपाने वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या.
सकाळी ७ वाजतापासून ते दुपारी २ वाजतापर्यंत या वाहनाद्वारे ओला व सुका कचरा जमा करून त्याची नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. दुपारी २ वाजतानंतर ही वाहने मोटर वाहन विभागात जमा करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्याची परिस्थिती आहे. २०१६ मध्ये या वाहनांवर नियुक्त झालेल्या चालकांच्या मनमानी कारभारात वाढ झाली असून, चक्क रात्री ११ वाजतापर्यंत शहरातील हॉटेल, खानावळींमधील अन्न जमा करून त्याची विल्हेवाट लावताना अनेक वाहने फिरताना आढळून येतात. अर्थात, महापालिकेच्या इंधनाचा गैरवापर करीत वाहन चालक स्वत:च्या तुंबड्या भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही वाहने मोटर वाहन विभागात जमा न करता थेट वाहन चालकांच्या घरी उभी केली जातात. हा प्रकार कमी म्हणून की काय, उघड्यावर बेवारस स्थितीत सोडून वाहन चालक पळ काढत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कचरा जमा करणाºया वाहनांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटर वाहन विभागावर नाराजी

  • मोटर वाहन विभागाच्या कामकाजावर आयुक्त संजय कापडणीस यांची तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे.
  • शहरातील कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या, उघड्यावरील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या मालकीचे व खासगी तत्त्वावर लावण्यात आलेले ट्रॅक्टर असा मोठा लवाजमा असताना शहरात कचºयाची समस्या दिसून येते.


कचरा जमा केल्यानंतर संबंधित वाहन मोटर वाहन विभागात जमा करणे भाग आहे. मनपाच्या इंधनाचा व वाहनांचा खासगी कामांसाठी होणारा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठीच ‘जीपीएस’प्रणाली कार्यान्वित केली जाईल.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

Web Title:  GPS system for Akola municipal corpration's Ghanta Gadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.