२५ कोटींचा मदतनिधी होणार शासनजमा!

By Admin | Updated: March 6, 2015 01:52 IST2015-03-06T01:52:59+5:302015-03-06T01:52:59+5:30

अकोला जिल्ह्यातील ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकरी वंचित.

Government will help 25 crores | २५ कोटींचा मदतनिधी होणार शासनजमा!

२५ कोटींचा मदतनिधी होणार शासनजमा!

संतोष येलकर/ अकोला : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत उपलब्ध निधीतून गुरुवारपर्यंंत २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाखांची मदत महसूल विभागामार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आली. मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंंत करावयाचे असले तरी; ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे खाते क्रमांकाविना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांच्या मदतीची २५ कोटींची रक्कम शनिवारी शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात ९ जानेवारी रोजी ७५ कोटी ७ लाख आणि दुसर्‍या टप्प्यात ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ११ लाखांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपयांचा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम गत १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले. गुरुवार, ५ मार्चपर्यंंत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांपैकी २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाख ८ हजार ५३९ रुपयांची मदत बँकांमध्ये जमा करण्यात आली. ७ मार्चपर्यंंत मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचा आकडा १२0 कोटींवर जाण्याची शक्यता गृहित धरली तरी, ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांकच महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. शासनाच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची मदत ७ मार्चपर्यंंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावयाची आहे; मात्र दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. बँक खाते क्रमांकाविना ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा २५ कोटींवर मदतनिधी ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा करण्यात येणार आहे. मदतीचा निधी उपलब्ध असूनही बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा कोट्यवधीचा मदतनिधी शासनजमा करण्याची वेळ महसूल विभागावर आली आहे.

Web Title: Government will help 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.