माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे!
By Admin | Updated: December 22, 2015 16:42 IST2015-12-22T16:42:21+5:302015-12-22T16:42:21+5:30
आयुक्तांशी वाद घालून त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देणार्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी आयुक्त लहाने यांच्या

माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे!
अकोला: आयुक्तांशी वाद घालून त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देणार्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी आयुक्त लहाने यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला.
मनपाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांनी फेब्रुवारी महिन्यात शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मोहीम सुरू केली. यासाठी कर वसुली निरीक्षक, बांधकाम विभागाचे अभियंता, १00 पेक्षा जास्त शिक्षक, तसेच सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली. या मोहिमेला दहा महिन्यांचा कालावधी होत आला, तरी अद्यापही मोजमाप घेतलेल्या मालमत्तांची माहिती संगणकात संकलित झाली नाही. यामुळे मनपाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. १९ डिसेंबर रोजी हा कळीचा मुद्दा आयुक्त अजय लहाने यांनी साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्यासमोर उपस्थित करताच, त्यांच्यात वाद झाला होता. शनिवारी आयुक्तांनी मडावी यांच्याकडील उपायुक्त पदाचा प्रभार काढून घेतल्यानंतर, दुसर्याच दिवशी, २0 डिसेंबर रोजी मडावी यांनी आयुक्त लहाने यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा सर्व प्रकार लक्षात घेता, आयुक्त लहाने यांनी साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी नगर विकास विभागाकडे पाठविला. मनपा आयुक्तांच्या दालनात घडलेल्या प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)