कापसाची शासकीय खरेदी सुरू ; सोयाबीनची लांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:18 IST2018-11-21T13:16:15+5:302018-11-21T13:18:03+5:30
अकोला: कापसाची शासकीय खरेदी मंगळवारपासून अकोला येथे सुरू झाली असून, सोयाबीनची खरेदी लांबली आहे.

कापसाची शासकीय खरेदी सुरू ; सोयाबीनची लांबली!
अकोला: कापसाची शासकीय खरेदी मंगळवारपासून अकोला येथे सुरू झाली असून, सोयाबीनची खरेदी लांबली आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकºयांना सोयाबीन खासगी बाजारातच विकावे लागत आहे; पण यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे दर बºयापैकी असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कापसाची वेचणी अंतिम टप्प्यात आहे. तर सोयाबीनची काढणी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात संपली. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकºयांना सोयाबीन, कापूस विकण्यावाचून दुसरा पर्याय नाही; पण मंगळवार २० नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथे हमी दराने शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ झाला; परंतु सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकरी चिंतेत असताना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, आजमितीस हे दर प्रतिक्विंटल ३,३२० ते ३,३२५ रुपयांवर पोहोचल्याने शेतकºयांची चिंता कमी झाली आहे. तथापि, काढणी हंगामाच्या सुरुवातीला अल्पभूधारक शेतकºयांनी २,४०० ते २,८०० पर्यंत सोयाबीन विकले. सोयाबीनचे हमी दर प्रतिक्विंटल ३,३९९ रुपये आहेत. त्या तुलनेत बाजरात ५५ ते ६० रुपये कमी असले तरी शेतकºयांकडील सोयाबीन थेट खरेदी केले जात आहे. शासकीय खरेदी केंद्रावर याच सोयाबीनसाठी प्रतवारीचे निकष लावण्यात आले असते. त्यामुळे शेतकरी सध्या समाधानी आहे.
महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्यावतीने येत्या आठवड्यात राज्यात ५० शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू केली जाणार आहेत. अकोल्यात खरेदी केंद्र सुरू होण्याअगोदर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे.
हमी दरापेक्षा बाजारात कापसाचे दर जास्त आहेत; पण हे दर कमी होऊ नये म्हणून, हमी दराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. येत्या आठ दिवसात राज्यात ५० खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
- प्रसेनजित पाटील,
उपाध्यक्ष, पणन महासंघ, बुलडाणा