महान-उन्नई बंधारा जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे!
By Admin | Updated: June 8, 2016 02:22 IST2016-06-08T02:22:57+5:302016-06-08T02:22:57+5:30
२४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी केला सादर.

महान-उन्नई बंधारा जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे!
अकोला: महान येथील काटेपूर्णा धरण ते उन्नई बंधार्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी २३ कोटी ७८ लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. महान येथील काटेपूर्णा धरणातून खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी धरणातून काटेपूर्णा नदीत पाणी सोडले जाते. नदीतील पाणी खांबोराजवळील उन्नई बंधार्यात साठविल्यानंतर बंधार्यातून ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्याने पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरण ते खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंंत २३ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी २३ कोटी ७८ लाखांच्या कामाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आले. त्यानुषंगाने विशेष बाब म्हणून महान येथील काटेपूर्णा ते उन्नई बंधार्यापर्यंंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ७ जून रोजी शासनाकडे सादर केला.