शासकीय दूध योजनेचा भुकटी प्रकल्प ठप्प!
By Admin | Updated: December 11, 2014 00:48 IST2014-12-11T00:48:07+5:302014-12-11T00:48:07+5:30
अतिरिक्त दूध अकोल्याला आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

शासकीय दूध योजनेचा भुकटी प्रकल्प ठप्प!
राजरत्न सिरसाट /अकोला
देशातच नव्हे, तर परदेशात ख्याती मिळवलेला अकोला शासकीय दूध योजेनीतील भुकटी प्रकल्प गत सहा वर्षांपासून ठप्प पडला आहे. दीड लाख लीटर दुधाची भुकटी तयार करणारी येथील यंत्रसामग्री सद्य:स्थितीत गंजण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील अतिरिक्त ठरणारे दूध या भुकटी प्रकल्पाला दिल्यास महाराष्ट्रातील एकमेव या योजनेला पुन्हा गतवैभव होऊ शकते.
दीड लाख लीटर दुधावर प्रक्रिया करणार्या या शासकीय दूध योजनेत सन १९८८ पासून दूध भुकटी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. अमरावती विभागातून जवळपास ७0 हजार लीटर दुधाचा पुरवठा या योजनेला होत होता. उर्वरित दूध मराठवाड्यातून आणून पूर्ण क्षमतेने या योजनेत भुकटी तयार करण्यात येत होती. येथे निर्मित दज्रेदार दुधाच्या भुकटीला देशातील अनेक प्रांतांमध्ये मागणी तर होतीच, शिवाय परेदशातही या दूध भुकटीची निर्यात करण्यात येत होती; परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात खासगी दूध डेअरी आणि खासगी भुकटी प्रकल्प सुरू झाल्याने या योजनेला दुधाचा पुरवठा कमी झाला. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेवर होऊन २00८ मध्ये तो बंद पडला. कालांतराने विभागातील दुधाची आवकही कमी झाल्याने कर्मचार्यांचेही काम कमी झाले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध भुकटी प्रकल्पांना शासनाने प्रतिलीटर दोन रुपये अनुदान दिले. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील या एकमेव दूध भुकटी प्रकल्पाला बसला. हा प्रकल्प बंद पडल्याने लाखो रुपये खचरून उभारण्यात आलेल्या येथील यंत्रांना गंज चढला असून, या योजनेला प्रचंड अवकळा आली आहे. आता याच सर्व खासगी दूध योजना आणि प्रकल्पाकंडे दुधाचा जादा पुरवठा होत आहे. दुधाचे कमिशन वाढवून देण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. हेच अतिरिक्त दूध अकोल्याच्या या दूध भुकटी प्रकल्पाला प्राप्त झाल्यास पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. याकरिता शासनाने या प्रकल्पाची दखल घेण्याची गरज आहे.