मका विक्रीमध्ये शासनाला दोन कोटींचा तोटा
By Admin | Updated: January 17, 2015 00:12 IST2015-01-17T00:12:10+5:302015-01-17T00:12:10+5:30
शासनाची भरड धान्य खरेदी योजना; उशिरा निविदा काढण्याचा परिणाम.

मका विक्रीमध्ये शासनाला दोन कोटींचा तोटा
पंजाबराव ठाकरे /संग्रामपूर (जि. बुलडाणा) :
शेतकर्यांकडून १३१0 रुपये हमीभावाने खरेदी केलेला मका राज्य शासनाने अत्यंत अल्प दरात, म्हणजे केवळ ८00 रुपये क्विंटल दराने व्यापार्यांना विकल्यामुळे शासनाला दोन कोटी ६४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
गतवर्षी शासनाने हमीभावानुसार भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केला. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ३३ हजार ११६ क्विंटल मका १३१0 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करून तो जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यातील गोदामांमध्ये ठेवण्यात आला होता. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतकर्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासन शेतकर्यांचा माल हमीभावाने खरेदी करते. भरडधान्य खरेदीसाठी खरेदी -विक्री संस्था शासनाचा सबएजंट म्हणून काम करते.
या मोबदल्यात खरेदी-विक्री संघाला कमिशन मिळत असले तरी बारदाना, कमिशन, गोडावून भाडे आदींवर होणारा खर्च हा शासनाच्याच तिजोरीतून होतो. मागील हंगामात ३३ हजार ११६.५0 क्विंटल मका १३१0 रुपये क्विंटल या भावाने शासनाने खरेदी केला. त्यानुसार जवळपास ४ कोटी ३३ लाख ८२ हजार ६१५ रुपयात शासनाने शेतकर्यांकडून मका विकत घेतला होता. हा मका शासन जेव्हा विक्रीला काढते, तेव्हा ज्यादा भाव मिळावा, ही अपेक्षा होती. प्रत्यक्षात खरेदीच्या अध्र्या किमतीमध्ये, म्हणजे ८00 रूपये प्रती क्विंटलनुसार व्यापार्यांना विकण्याची निविदा काढून ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे शासनाला २ कोटी ६४ लाख ९३ हजार २00 रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
दरम्यान जिल्हा मार्केटींग अधिकारी बी एम सोनुने यांनी मका विक्रीसाठी शासनाने आतापर्यंत तीनवेळा निविदा काढल्यात मात्र व्यापार्यांनी निविदा भरल्या नसल्याचे सांगीतले. त्यामुळे कमी भावाने निविदा काढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला.
*व्यापार्यांना क्विंटलमागे २५0 रूपये नफा
शासनाने मका खरेदी केला, तेव्हा बाजारात भाव कमी होते. त्यामुळे शेतकर्यांना १३१0 रुपये भाव मिळाला. हाच मका शासनाने डिसेंबर महिन्यात निविदा काढून विकला, त्यावेळी बाजारात मक्याचे भाव एक हजार पन्नास रुपये होते. तरीही शासनाने केवळ ८00 रूपये भावाने हा मका व्यापार्यांना विकला. त्यामुळे व्यापार्यांना एका क्विंटलमागे २५0 रुपये नफा झाला. आता व्यापारी हाच मका नव्याने बाजारात आणून आजच्या भावाने विक्री करू शकतात. मक्याचे सध्याचे भाव ११00 रूपये आहेत. थोडक्यात व्यापारी यावर पुन्हा नफा कमावण्यास मोकळे, यात नुकसान मात्र शासनाचे होत आहे.