सत्ताधारी, प्रशासनाचे कान, नाक, डोळे बंद!
By Admin | Updated: December 19, 2014 01:48 IST2014-12-19T01:48:08+5:302014-12-19T01:48:08+5:30
पथानाट्याद्वारे अकोला येथील शिक्षकांनी केला निषेध.

सत्ताधारी, प्रशासनाचे कान, नाक, डोळे बंद!
अकोला: कार्यरत शिक्षकांसह सेवानवृत्त शिक्षकांचे मागील आठ महिन्यांचे वेतन थकीत असून, शिक्षक संघटनांनी १0 डिसेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनाची सत्ताधार्यांसह प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. यामुळे प्रशासन व सत्ताधार्यांनी कान, नाक व डोळे बंद केल्याचा देखावा शिक्षकांनी पथनाट्याद्वारे सादर केला. शिक्षकांचे पथनाट्य पाहण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मनपात चांगलीच गर्दी जमली होती. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे गिरवणार्या मनपा शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रशासनाने मागील आठ महिन्यांपासून वेतनापोटी एक छदामही अदा केले नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे मनपा शिक्षकांचे मे व जून महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले. जोपर्यंत वेतनाचा उर्वरित ५0 टक्के हिस्सा मनपाकडून जमा होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना पुढील वेतनाचा टप्पा मिळणार नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत तोंडी आश्वासनाशिवाय पदरात काहीही मिळाले नसल्याचा आरोप करीत शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. १0 डिसेंबरपासून सुरू असलेल्या विविध आंदोलनाच्या मार्गाने शिक्षकांनी प्रशासन व सत्ताधार्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. प्रशासन व सत्ताधार्यांनी कान, नाक व डोळे बंद केल्याचा देखावा शिक्षकांनी पथनाट्याद्वारे सादर केला. पथनाट्याचे सादरीकरण गमतीदार व रंजकपणे करण्यात आले. पथनाट्य पाहण्यासाठी मनपा आवारात चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष कैलाश नागे, सचिव हरिश्चंद्र इटकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय शिरेकर, सचिव गोकुल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.