नगरसेवकांसाठी ‘अच्छे दिन’?
By Admin | Updated: January 13, 2015 01:27 IST2015-01-13T01:27:09+5:302015-01-13T01:27:09+5:30
४ कोटीच्या निधीतून समान वाटपाच्या प्रस्तावासाठी प्रयत्न.

नगरसेवकांसाठी ‘अच्छे दिन’?
अकोला - महापालिकेला विकास कामांसाठी मिळालेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीतून सर्व नगरसेवकांना समान वाटप करण्याचा प्रस्ताव एका ज्येष्ठ नगरसेवकाकडून ठेवण्यात आला. विशेष म्हणजे हा निधी भारिप-बमसं आणि काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना विकास कामांसाठी आरक्षित करून ठेवण्यात आला होता. यात वाटा मिळावा म्हणून आता काही नगरसेवकांनी समान वाटपाच्या प्रस्तावासाठी आटापीटा सुरू केला असल्याची माहिती आहे.
अकोला शहरातील प्रमुख मार्गांसह सर्वत्र अतिक्रमणाचा विखळा होता. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका अधिकार्यांनी धडक मोहीम राबविली. एकीकडे अतिक्रमण काढले जात असताना दुसरीकडे मात्र अतिक्रमणाची समस्या वाढतच होती. अतिक्रमण काढलेल्या जागेवर विकास कामे व्हावी यासाठी मनपा प्रशासनाने निधीची जुडवा-जुडव सुरू केली होती. प्रशासनाच्या प्रयत्नाला यश आले आणि भारिप-बमसं व काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना ४ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात मंजूर करण्यात आला. या निधीतून शहरातील जवाहर नगर चौक ते शासकीय दूध डेअरी, घोडदौड रस्ता आणि गोरक्षण रोडवरील अतिक्रमण काढून या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव या निधीतून ठेवण्यात आला होता. ही योजना मात्र काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या पचणी पडली नाही. निधीतून आपल्याला वाट्याला काही येणार नाही आणि विकास कामांचे श्रेयही लाटता येणार नाही, याची जाणीव झालेल्या या ज्येष्ठ नगरसेवकांनी आता ४ कोटीच्या निधीतून सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात समान वाटप करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर सर्व नगरसेवकांकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवाय हा प्रस्ताव महापालिकेच्या आगामी सभेत ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा प्रस्ताव असला तरी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा या प्रस्तावाला विरोध असल्यामुळे सभेत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे