अंकुरलेल्या कपाशीवर गोनोशिफॅलमचे आक्रमण!
By Admin | Updated: July 30, 2014 01:12 IST2014-07-30T01:12:50+5:302014-07-30T01:12:50+5:30
‘काळी म्हैस’ (गोनोशिफॅलम) नावाच्या किडीने अंकुरलेले कपाशीचे पीक फस्त करणे सुरू केल्याने विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

अंकुरलेल्या कपाशीवर गोनोशिफॅलमचे आक्रमण!
अकोला : पूरक पाऊस नसल्याने दुबार, तिबार पेरणी करणार्या शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पुन्हा पाऊसच आला नसल्याने, 'काळी म्हैस' (गोनोशिफॅलम) नावाच्या किडीने अंकुरलेले कपाशीचे पीक फस्त करणे सुरू केल्याने विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतरच शेतकर्यांना पेरणीसाठीची तिफण बाहेर काढावी लागली. महागडे बियाणे घरात ठेवण्यापेक्षा शेतकर्यांनी पेरणीचा निर्णय घेतला. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे; तथापि पाऊस नियमीत नसल्याने पीकं संकटात सापडली आहेत. एका दिवसाच्या पावसानंतर आठ दिवसांचा खंड पडत असल्याने काळी म्हैस नावाच्या किडीचा पिकावर उपद्रव वाढला आहे. सोयाबीन व हरभरा ही या किडीची आवडीची पिकं आहेत; परंतु सध्या या किडीने कपाशी पिकावर आक्रमण केले आहे. एका दिवसात जवळपास अर्धे शेत ही कीड फस्त करीत असल्याने, शेतकर्यांना अतिरिक्त कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे वर्हाडातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अकोला तालुक्यातील मौजे हिंगणी बु. येथे कृषी विभागाच्या तज्ज्ञ चमूने संयुक्तपणे कापूस पेरणी क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी या चमूला कपाशीची रोपे काळी म्हैस (गोनोशिफॅलम) या किडीने कुरतडल्याचे दिसून आले. या किडीने केलेल्या नुकसानीची आर्थिक पातळी मोठी आहे. या किडीचा वर्हाडात सर्वत्र उद्रेक झाला असून, अकोट तालुक्यातील कुटासा येथे ७५ टक्के कपाशीचे पीक या किडीने फस्त केल्याचे आढळून आले आहे. कपाशी या पिकासह मूग लागवड क्षेत्रावर मुळकुंज या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वर्हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांना किडींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.