खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात घातल्या शेळ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:00+5:302021-05-15T04:18:00+5:30
मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार ...

खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात घातल्या शेळ्या!
मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, शेतात पिकविलेला भाजीपाला सडत असल्याचे चित्र आहे. लागवडी खर्चही निघत नसल्याने तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील शेतकरी शुभाष काशिनाथ वानखडे यांनी तीन एकरांतील उभ्या शेतात शेळ्या चराईसाठी घातल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे.
लॉकडाऊन असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे भाजीपाला विकल्या जात नाही. शेतकरी शुभाष वानखडे यांच्या शेतात भेंडी, गवार, चवळी व टोमाटो अशा प्रकारचे पीक होते. बंदमुळे भाजी काढण्याचा कालावधी संपल्याने ती जरड अवस्थेत आली आहे. भविष्यात अशा भाज्यांना मागणी नसल्याने शेतात गुरे चारण्यापासून पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------
बाजारपेठेत भाव नाही!
कोरोनाच्या काळात भाजीपाल्यांना जसा पाहिजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतीत काबाडकष्ट करून शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नाही. गत महिन्यात मूर्तिजापूर भाजी मार्केटमध्ये पहिल्या काढणीचा भाजीपाला जेव्हा नेण्यात आला होता, तेव्हा काढणीचा खर्च तर सोडाच, गाडी भाड्याचाही वसूल झाले नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
--------------------------
नुकसान भरपाई देण्याची मागणी
यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात भुईमूग, कांदा, भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे. अति तापमानामुळे भुईमुगाला शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली, तसेच बाजारपेठ बंदचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी सुभाष वानखेडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.