अंत्यविधीसाठी गोशाळांमधे निर्मित गोव-यांचा वापर करावा!
By Admin | Updated: December 17, 2015 02:55 IST2015-12-17T02:29:54+5:302015-12-17T02:55:34+5:30
व्हाईट कोलऐवजी गोव-यांचा अंत्यविधीकरिता उपयोग व्हावा; जावाहरिप्रिया गौशाळेची अकोला मनपा आयुक्तांकडे मागणी.

अंत्यविधीसाठी गोशाळांमधे निर्मित गोव-यांचा वापर करावा!
अकोला: अंत्यविधीकरिता लागणार्या लाकडासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड केली जाते. लाकडास पर्याय म्हणून स्मशानांमध्ये अंत्यविधीकरिता व्हाईट कोलचा वापर केला जात आहे. मात्र, व्हाईट कोलऐवजी शहरातील गोसेवा केंद्रांमधे गायीच्या शेणापासून निर्मित गवर्यांचा उपयोग अंत्यविधीकरिता केला जावा, अशी मागणी हरिप्रिया गौशाळेचे अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता व्हाइट कोलचा वापर हा अतिशय स्तुत्य उपक्रम असला तरी, जनावरांना लागणार्या चार्यापासून त्याची निर्मिती केली जाते. अल्पवृष्टीमुळे यंदाच्या उन्हाळय़ात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र जाणवणार आहेत. एन उन्हाळय़ात जिल्हय़ात चाराटंचाई निर्माण होऊ नये याकरिता व्हाइट कोलच्या निर्मितीवर त्वरित निर्बंध आणण्याची मागणी डॉ. उटांगळे यांनी मनपा आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे. व्हाइट कोल तयार करणारे कारखानदार शेतकर्यांकडून जादा दराने चारा खरेदी करीत असून, आर्थिक गरज भागविण्यासाठी जिल्हय़ातील शेतकरी त्यांच्या शेतातील कडबा-कुटार या कारखानदारांना विकत असल्याचे चित्र आहे. व्हाइट कोल निर्मितीकरिता औद्योगिक परिसरात जाणारे जनावरांचे हे खाद्य अकोल्यात सात ठिकाणी असलेल्या गोशाळांकडे वळविल्यास, येत्या उन्हाळय़ात अकोला जिल्हय़ात चारा डेपो निर्माण करण्याची गरज भासणार नाही. या माध्यमातून शहरातील गोशाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणार्या गोवर्यांचा वापर अंत्यविधीसाठी केला जाऊ शकतो. अंत्यविधीकरिता व्हाइट कोलऐवजी गोवर्यांचा वापर करणे ही बाबदेखील पर्यावरणपुरकच असल्याने, उन्हाळय़ापूर्वीच याबाबत योग्य तो निर्णय घेऊन उपाययोजना करण्याची मागणी डॉ. सतीश उटांगळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. याबाबत अधिक विचारणा करण्यासाठी डॉ. उटांगळे यांच्याशी संपर्क साधला असता, या पर्यावरणपुरक उपक्रमास हातभार लावण्यास अकोल्यातील सात गोसेवा केंद्र तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.