‘जीएमसी’त डॉक्टरांचा वाढतोय मानसिक तणाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:29 IST2019-09-01T15:29:42+5:302019-09-01T15:29:56+5:30

वाढती रुग्णसंख्या अन् अल्प प्रमाणात डॉक्टरांची संख्या, यामुळे आहे त्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असून, त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे.

'GMC' doctors are increasing mental stress! | ‘जीएमसी’त डॉक्टरांचा वाढतोय मानसिक तणाव!

‘जीएमसी’त डॉक्टरांचा वाढतोय मानसिक तणाव!

अकोला : मानसिक आरोग्य ठीक, तर सर्वच ठीक, असे डॉक्टरांकडून नेहमीच रुग्णांना सांगितले जाते; पण डॉक्टरांचेच मानसिक आरोग्य धोक्यात येत असेल, तर नवलच. अशीच काहीशी स्थिती सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांची झाली आहे. वाढती रुग्णसंख्या अन् अल्प प्रमाणात डॉक्टरांची संख्या, यामुळे आहे त्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असून, त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात रिक्त पदांची मोठी समस्या आहे. अशातच ग्रामीण भागात वैद्यकीय उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत आवश्यक मनुष्यबळ नसल्याने येथे नेहमीच गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याचा थेट परिणाम डॉक्टरांच्या अरोग्यावर होत असून, डॉक्टर विविध समस्यांना सामोरे जात आहेत. महाविद्यालय प्रशासनातर्फे रिक्त पदभरतीसोबतच नव्याने पदनिर्मितीची मागणी केली आहे; मात्र ही रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने डॉक्टरांवर रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. साधारणत: आठ खाटांमागे एक डॉक्टर असणे अपेक्षित असताना सर्वोपचार रुग्णालयात एक डॉक्टर दोन वॉर्डात रुग्णसेवा देतो. म्हणजेच ४० रुग्णांमागे एक डॉक्टर रुग्णसेवा देत आहे. हा ताण मुख्यत: कनिष्ठ व वरिष्ठ निवासी तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे डॉक्टरांना विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


काय म्हणतो, ‘डब्ल्यूएचओ’चा अहवाल

  • डॉक्टरांनी आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम नसावे.
  • या नियमाचे जगभरात पालन केले जाते.
  • अकोल्यात मात्र आठवड्याला ६० तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.


कामाचा अतिरिक्त व्याप वाढल्याने डॉक्टरांनाही मानसिक ताण येऊ शकतो. डॉक्टरांची संख्या वाढल्यास त्यांच्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प, अकोला.

Web Title: 'GMC' doctors are increasing mental stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.