मुलींना मिळणार मोफत सायकल
By Admin | Updated: February 23, 2015 01:44 IST2015-02-23T01:44:11+5:302015-02-23T01:44:11+5:30
विशेष घटक योजनेत अकोल्यासह तीन जिल्ह्यांकरिता १११ लाखांचा निधी

मुलींना मिळणार मोफत सायकल
अकोला- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे विशेष घटक योजनेतून मुलींना मोफत सायकल दिली जाणार आहे. त्यासाठी अकोल्यासह राज्यातील तीन जिल्ह्यांकरिता वित्त विभागाने १११ लाख रुपयांचा निधी शनिवारी मंजूर केला. विशेष घटक योजनेअंतर्गत मुलींना मोफत सायकली पुरविण्याची योजना राबविली जाते. ग्रामीण आणि दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मुलींना शाळेत जाण्यासाठी अडचणी येऊ नये, त्यांना किमान शिक्षण घेता यावे, घरापासून शाळा लांब असेल तर त्यांना शाळेत जाण्यासाठी वाहन मिळावे, या उद्देशाने मोफत सायकली देण्याची योजना जिल्हा नियोजन समितीतर्फे राबविण्यात येत आहे. २0१४-१५ या वर्षाकरिता अकोला जिल्हय़ासह मराठवाड्यातील परभणी आणि आणि जालणा जिल्ह्याकरिता वित्त विभागाने १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मंजूर केला आहे. अकोला जिल्ह्याला ३0 लाख रुपये मिळाले असून परभणीकरिता ८0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याला १ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांमार्फत ही योजना राज्यात राबविली जात असून डीपीसीअंतर्गत निधीचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकार्यांकडे या योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.