पत्नीपासून वाचवा हो..!
By Admin | Updated: April 2, 2016 01:38 IST2016-04-02T01:09:05+5:302016-04-02T01:38:06+5:30
वृद्धाची कोतवाली पोलिसात धाव, पोलीसही झाले अवाक.

पत्नीपासून वाचवा हो..!
अकोला - पती तसेच सासरच्या छळाला कंटाळून अनेक विवाहितांनी पोलिस स्टेशनची पायरी चढल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, शुक्रवारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्धाने लगबगीने येत पत्नीपासून वाचवा हो, अशी विनंती करीत पत्नीच्या विरोधात तक्रार केली. पत्नीच्या प्रचंड छळाला कंटाळलेल्या या वृद्धाचे म्हणणे ऐकल्यानंतर सिटी कोतवालीचे कर्मचारीही अवाक् झाले. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका ७९ वर्षीय वृद्धाने शुक्रवारी सकाळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर स्टेशन डायरीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांची भेट घेऊन पत्नीपासून वाचवा, अशी विनंती केली. यावर पोलीस कर्मचार्यांनी वृध्दाला अधिक विचारणा करीत तक्रार देण्याचे सांगितले. वृद्धाला त्याची पत्नी रोजच धमक्या देत असून, विहिरीत फेकून देण्याची भीती दाखविते. त्यामुळे पत्नीच्या या रोजच्या वागण्याने पती पूर्णपणे त्रासला असून, पत्नीपासून धोका असल्याची तक्रार त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. पत्नीच्या या भयंकर रौद्ररूपापुढे पती हतबल झाला असून, तो उतारवयात पत्नीविरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी पुढे आला. पोलीस तक्रार केल्याने पत्नी आणखी छळणार असल्याचेही वृद्धाचे म्हणणे आहे.