सर्वसाधारण सभा स्थगित; सत्ताधा-यांची नाचक्की
By Admin | Updated: May 28, 2015 18:57 IST2015-05-28T18:57:01+5:302015-05-28T18:57:01+5:30
विरोधकांचा हल्लाबोल; मनपा बरखास्त करण्याची मागणी.

सर्वसाधारण सभा स्थगित; सत्ताधा-यांची नाचक्की
अकोला: शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे कारण देत स्थगित करण्याची वेळ महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यावर आली. महापालिकेत चक्क तिसर्यांदा सभा स्थगित करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर ओढवली असून, विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करीत मनपा बरखास्त करण्याची मागणी लावून धरली आहे. मालमत्तांच्या पुनमूुल्यांकनासाठी जीआयएस प्रणाली, शहर बस सेवा, सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निविदेला मंजुरी देण्यासह महान ते मोर्णा प्रकल्पापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २७ मे रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. सभा सुरू होण्यापूर्वीच भाजप नगरसेवक सुरेश अंधारे यांनी महिला नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याची सूचना केली. सभागृहात शिवसेना, भाजप, काँग्रेस, भारिप-बमसंचे अवघे १४ नगरसेवक उपस्थित असताना महापौरांनी सभा सुरू करण्याचे निर्देश नगर सचिव अनिल बिडवे यांना दिले. बिडवे यांनी सभेला सुरुवात करताच, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी नगरसेवकांची पुरेशी संख्या नसल्याने सभेचे कामकाज घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. ही चूक लक्षात येताच, महापौरांनी अवघ्या दहा मिनिटात सभा स्थगित केल्याचे जाहीर केले. भाजपतील अंतर्गत कलह शहर विकासाच्या मुळावर उठल्याची टीका काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड, भारिपचे गजानन गवई यांनी केली.