स्थायी समितीत गाजला हरभरा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:27 IST2017-09-21T01:27:00+5:302017-09-21T01:27:16+5:30
अकोला : हरभरा बियाणे वाटपातील घोटाळ्यासह रखडलेले पुस्तकांचे वाटप, वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी चांगलीच गाजली. दलित वस्ती योजनेंतर्गत वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी नस्ती (फाइल) सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश सभेत देण्यात आला.

स्थायी समितीत गाजला हरभरा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हरभरा बियाणे वाटपातील घोटाळ्यासह रखडलेले पुस्तकांचे वाटप, वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी चांगलीच गाजली. दलित वस्ती योजनेंतर्गत वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी नस्ती (फाइल) सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश सभेत देण्यात आला.
हरभरा बियाणे वाटपातील घोटाळा प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या १४२ कृषी सेवा केंद्रांपैकी किती कृषी सेवा केंद्रांवर सुनावणी झाली, याबाबत सदस्य गोपाल कोल्हे यांनी विचारणा केली. त्यावर कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईच्या दृष्टीने निर्णय घेता येत नसल्याचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी सभागृहात सांगितले. कृषी विकास अधिकार्यांच्या या उत्तरावर सदस्य कोल्हे यांनी ‘मग सुनावणीच कशाला घेता’, असा सवाल केला. कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याच्या मुद्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप योजनेंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळाली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा प्रश्न सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी उपस्थित केला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कृती आराखड्यात नसताना वाडेगाव येथील रस्त्याचे काम मंजूर ठिकाणी न करता दुसर्या ठिकाणी करण्यात आले आणि या रस्ता कामाच्या भूमिपूजनाला मी उपस्थित नसताना छायाचित्रात मात्र मी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले. यासंदर्भात संबंधित कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सदस्य डॉ.घाटोळ यांनी केली. तसेच सस्ती येथील आरोग्य केंद्रांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा सदस्य शोभा शेळके यांनी उपस्थित केला. या पृष्ठभूमीवर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांची वेतनवाढ रोखण्यासाठी ‘फाइल’ सादर करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले. जिल्हय़ातील पाणीटंचाईच्या मुद्यावर या सभेत चर्चा करण्यात आली.
अनुपालन अहवालात सविस्तर खुलासा द्या!
समितीच्या सभेत सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांचा संबंधित विभागांनी सविस्तर खुलासा दिला पाहिजे, अशी मागणी सदस्य विजय लव्हाळे यांनी सभेत केली, तर सर्वशिक्षा अभियानांतर्गत स्वयंपाक खोली बांधकामासाठी दिल्या जाणार्या अनुदानाची चौकशी करण्याची मागणी सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी केली.
‘बारुल्या’तील गावांना उगवापासून पाणीपुरवठा करा!
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी उगवापर्यंत आहे. तेथून जलवाहिनीद्वारे बारुला विभागातील गावांना पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्य शोभा शेळके यांनी सभेत केली.