कारागृहातील गांजा तस्करीप्रकरणी सुभेदार गजाआड
By Admin | Updated: July 8, 2014 00:15 IST2014-07-08T00:15:12+5:302014-07-08T00:15:12+5:30
कारागृहातील गांजा तस्करीप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कारागृहातील सुभेदारास सोमवारी सायंकाळी अटक केली.

कारागृहातील गांजा तस्करीप्रकरणी सुभेदार गजाआड
अकोला: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना कारागृहातील कर्मचार्यांकडून अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. कारागृहातील गांजा तस्करीप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कारागृहातील सुभेदारास सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी कारागृह सुभेदाराला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगणार्या बंदीवान आरोपी चप्पलमधून गांजा तस्करी करीत असल्याचा प्रकार रविवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी बंदीवान राजू विठोबा गाभणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. झडती अंमलदार रमेश गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कारागृहातील बंदीवान राजू विठोबा गाभणे (४५ रा. रिसोड) याला कर्मचारी ध्रुवास पठाडे यांनी झाडू कामासाठी बाहेर काढले. बाहेर काम केल्यानंतर राजू गाभणे याला सकाळी ११.३0 वाजता दरम्यान कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घेण्यात आले. यावेळी झडती अंमलदार रमेश गव्हाणे यांनी त्याची झडती घेतली असता, त्यांच्या लक्षात आले की, आरोपीने चप्पलच्या सोलखाली ४0 ग्रॅम गांजा लपवून आणल्याचे दिसून आले. कारागृहातील कर्मचार्यांनी आरोपीकडून गांजा जप्त केला. कोतवाली पोलिसांनी बंदीवान राजू गाभणे याची कसून चौकशी केली असता, हा गांजा त्याला कारागृहात कार्यरत सुभेदार राजू मुरलीधर शेळके यांनी दिला असल्याची खळबळजनक माहिती दिली. पोलिसांनी राजू शेळके यांना अटक केली. शेळके यांनीच आरोपी राजू गाभणे याच्याकडे चप्पलच्या सोलमध्ये गांजा लपवून दिला होता; परंतु रमेश गव्हाणे यांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. (प्रतिनिधी)