मनपा आवारात टाकला कचरा

By Admin | Updated: May 7, 2015 01:30 IST2015-05-07T01:30:10+5:302015-05-07T01:30:10+5:30

कच-याच्या मुद्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Garbage deposited in Municipal premises | मनपा आवारात टाकला कचरा

मनपा आवारात टाकला कचरा

अकोला: मनपा प्रशासन कोट्यवधींचे देयक अदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणार्‍या कंत्राटदाराने कचरा उचलणे बंद केले. यामुळे शहरात सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असून, अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी बुधवारी मनपात आवारात दोन ट्रक घाणीने भरलेला कचरा आणून टाकल्याचा प्रकार घडला.
शहरातील कचरा उचलण्याचा कंत्राट खासगी तत्त्वावर देण्यात आला असून, हा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. कंत्राटाची मुदत लक्षात घेता, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी तत्काळ नवीन निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, कंत्राटदाराला थकीत देयक अदा न करता तात्पुरती मुदतवाढ देऊन आयुक्त ांनी ठोस निर्णय घेण्यास चालढकल केली.
वैतागलेल्या कंत्राटदाराने १ मे पासून कचरा उचलण्याचे काम बंद केले. यामुळे शहरातील मुख्य मार्गांसह ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले. दुर्गंधी व घाणीमुळे अकोलेकरांचा जीव मेटाकुटीला आला तरी त्यावर सत्ताधार्‍यांसह प्रशासन कोणताही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी मनपा आवारात घाणीने भरलेले दोन ट्रक कचरा आणून टाकला. यामधील एक ट्रक आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या दालनासमोर, तर दुसरा ट्रक महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनासमोर रिकामा केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मनपात प्रचंड धावपळ उडाली, तर दुर्गंधीमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Garbage deposited in Municipal premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.