टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST2021-04-06T04:17:50+5:302021-04-06T04:17:50+5:30

अकोला : अकोला शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन ...

A gang of three criminals was deported for two years | टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

अकोला : अकोला शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे २८ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

पातूर तालुक्यातील आगीखेड येथील रहिवासी संताेष ऊर्फ गाेंडू सीताराम गुडधे, गुलाब नारायण ठाकरे रा. हिवरा अंबाशी, ता. मेहकर जिल्हा बुलडाणा व विशाल उर्फ गाेविंदा सुरेश खरात रा. हिवरा अंबाशी बुलडाणा हे तिघे जण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून तिन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता त्यांनी या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून डाबकी पोलिसांनी या तीनही गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. डाबकी राेड पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या तिघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र तीनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या तीनही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश सोमवारी दिला असून टोळीला सोमवारपासूनच जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: A gang of three criminals was deported for two years