शौचालयासाठी गावागावांत ‘गांधीगिरी’
By Admin | Updated: January 23, 2016 01:54 IST2016-01-23T01:54:26+5:302016-01-23T01:54:26+5:30
जिल्हा प्रशासनामार्फत २५ व २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार.

शौचालयासाठी गावागावांत ‘गांधीगिरी’
अकोला: जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत २५ व २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) गावागावांत शौचालय नसलेल्या कुटुंबप्रमुखांना गुलाब पुष्प आणि जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन, शौचालय बांधकामासाठी गांधीगिरी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत २५ व २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम.एस. तुपकर यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व मनपाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात राबविण्यात येणार्या महास्वच्छता अभियानाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. त्यानुसार २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील गावागावांत रांगोळ्या काढून, पताका लावून प्रसन्न वातावरणात ध्वजारोहण केल्यानंतर सरंपच, ग्रामसेवक, तलाठी व सबंधित अधिकारी-कर्मचारी गावातील घरोघरी भेट देतील व गुलाबपुष्प देऊन आणि जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन शौचालय बांधण्यासाठी गांधीगिरी करण्यात येणार आहे.