भाजपच्या बैठकीत ठरणार पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य
By Admin | Updated: January 22, 2016 01:35 IST2016-01-22T01:35:04+5:302016-01-22T01:35:04+5:30
आज लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक.

भाजपच्या बैठकीत ठरणार पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य
अकोला: पाणीपुरवठा वितरण प्रणालीची निविदा मंजूर करायची किंवा नाही,या मुद्यावरून महापालिकेत सत्ताधारी भाजपात रंगलेल्या मानापमान नाट्याचा उद्या शेवट होण्याची शक्यता आहे. महापौर उज्ज्वला देशमुख विरुद्ध पक्षातील सर्व नगरसेवक, असा सामना रंगला असून, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या पक्ष कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा योजनेच्या भवितव्यावर निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
मूलभूत सोयी-सुविधांसाठी मनपाला २0१३ मध्ये २८ कोटींचा निधी प्राप्त झाला. मनपाची पाणीपुरवठा यंत्रणा खिळखिळी झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी २८ कोटीतून ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
मनपा प्रशासनाने ११ कोटी १ लाख रुपयांची निविदा प्रकाशित केली. नागपूर येथील एका कंपनीची १८ टक्के कमी दराने प्राप्त झालेली निविदा मंजुरीसाठी ८ जानेवारी रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेसमोर मांडली. साहजिकच, पाणीपुरवठय़ासाठी महत्त्वाची योजना असल्याने मत व्यक्त करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी माईक हातात घेताच,महापौर उज्ज्वला देशमुख यांनी निविदेला मंजुरी देण्यास सुरुवात केली. अग्रवाल यांनी मत मांडण्याचा आग्रह धरला असता, तो महापौरांनी स्पष्टपणे नाकारत विषयाला मंजुरी दिली.