तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:31 IST2016-04-22T02:31:12+5:302016-04-22T02:31:12+5:30
अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील घटना.

तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
दानापूर (जि. अकोला) : संपूर्ण जिल्हा कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असताना उष्माघाताने येथील एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. कैलास महादेव फुसे असे या तरुणाचे नाव असून, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यंदाच्या उन्हाळय़ात उष्माघाताचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. कैलास फुसे हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दिवसभर काबाडकष्ट करून कैलास फुसे घरी परत आले. उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांना रात्री ताप आला. रात्री घरगुती उपचार केल्यानंतर ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी ते प्रात:विधीसाठी बाहेर गेले. परत येताना त्यांना भोवळ आली व ते वान नदीच्या पात्रात कोसळले. काही ग्रामस्थांनी त्यांना उचलून घरी आणले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली; परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. कैलास फुसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कैलास फुसे हे मूळचे जळगाव जिल्हय़ातील वळोदा (पानाचे) गावचे रहिवासी होते. येथे ते त्यांच्या सासरवाडीत स्थायिक झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर वळोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.