Frustration and instant anger are leading to death! | नैराश्य अन् क्षणार्थ राग नेतोय मृत्यूच्या दारी!
नैराश्य अन् क्षणार्थ राग नेतोय मृत्यूच्या दारी!

- प्रवीण खेते
अकोला: बदलत्या जीवनशैलीसोबतच वाढती स्पर्धा, नैराश्य अन् क्षणार्थ राग हे कारणे आत्महत्येच्या मार्गाने मृत्यूच्या दारी आहेत. याचा सर्वाधिक बळी हा युवा वर्ग ठरत आहेत. सर्वोपचार रुग्णालायत आत्महत्येचा प्रयत्न करणारे दिवसाला सात ते आठ रुग्ण दाखल होतात. या धक्कादायक वास्तवावरून त्याचा कयास लावता येतो.
सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यात वाढती लोकसंख्या, शहरीकरण अन् विविध कारणाने येणाऱ्या आर्थिक समस्या तरुणाईला नैराश्येच्या गर्तेत नेत आहेत. तर शेतकरी वर्गात आर्थिक कारणांनी आलेल्या नैराश्येतून आत्महत्या होतात. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे नैराश्य हे प्रमुख कारण असले, तरी तज्ज्ञांच्या मते क्षणार्थ रागातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: किशोरवयिनांमध्ये हे प्रमाण जास्त आहे; परंतु या वयोगटातील मुलांमध्ये रागाचे प्रमाण अधिक असून, त्याकडे पालकांचे नेहमीच दुर्लक्ष होते. हा प्रकार गंभीर असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे.

असे आहे आत्महत्येचे प्रमाण

 • नैराश्य - ८५ टक्के
 • सायकोसीस - १० टक्के
 • इतर कारणे - ५ टक्के


सहा दिवसात २४ घटना

 • आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या २४ घटना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडल्या.
 • सर्वच रुग्णांवर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू.
 • सर्वाधिक रुग्ण १६ ते २५ वयोगटातील.
 • ८ स्त्री, तर १६ पुरुषांचा समावेश


हे करणे आवश्यक

 • जीवनशैली बदला
 • सकारात्मक विचार करा
 • आवडती गोष्ट करा
 • रागावर नियंत्रण ठेवा
 • विचारांचे आदान प्रदान करा


नैराश्य आणि क्षणार्थ येणारा राग यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हे टाळण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा. अशा प्रकरणात समुपदेशनासाठी राज्यभरात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन केले जात आहे.
- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प, अकोला

लहान लहान कारणांवरून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतात. ही चिंताजनक बाब आहे. या घटनांवर नियंत्रणासाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- डॉ. श्याम गावंडे, वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 


Web Title: Frustration and instant anger are leading to death!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.