भारनियमन नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित
By Admin | Updated: May 15, 2017 01:54 IST2017-05-15T01:54:20+5:302017-05-15T01:54:20+5:30
सस्ती वीज वितरण विभागाचा नियोजशून्य कारभार

भारनियमन नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : विद्युत वितरण कंपनीच्या पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र विभागाचा गेल्या काही दिवसांपासून भोंगळ कारभार सुरू आहे. खेट्री, चतारी, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा आदी परिसरातील भारनियमन नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याकडे कनिष्ठ अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून, परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.
लाइनमन मुख्यालयी राहत नाही, कधी गावात येत नाही, संपर्क केल्यास लाइनमन फोन उचलत नाही, प्रतिसाद देत नाही. सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. कनिष्ठ अभियंता यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे रात्रंदिवस चार-चार तासांपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. कर्मचाऱ्यांवर कनिष्ठ अभियंत्याचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचारी मनमानी करीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित किंवा बिघाड आल्यास नाइलाजाने खासगी लाइनमनला पैसे देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वितरण विभागाकडून विद्युत बिलाची वसुली करताना तत्परता दाखविली जाते. विद्युत पुरवठा सुरळीत करताना तत्परता का दाखविली जात नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.
धोकादायक रोहित्रामुळे अपघाताची शक्यता
खेट्री, चतारी, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा आदी परिसरातील सार्वजनिक ठिकाणातील रोहित्र धोकादायक आहे. अनेक वेळा किरकोळ घटना घडल्या आहे. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे रोहित्राला कुंपण करण्याची गरज आहे.
विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत संबंधित लाइनमनला ताकीद देण्यात येईल, तसेच धोकादायक रोहित्रांची पाहणी करू.
- डी. के. कंकाड, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती.