शिवकालीन योजनेची रोहयोमधून मुक्तता !
By Admin | Updated: January 11, 2015 00:33 IST2015-01-11T00:23:54+5:302015-01-11T00:33:06+5:30
आदेश प्राप्त ; बुलडाणा, जळगाव जिल्हा शिवकालीन योजनेतून वगळला.

शिवकालीन योजनेची रोहयोमधून मुक्तता !
बुलडाणा : बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील शिवकालीन योजनेची रोजगार हमी योजनेतून मुक्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहेत. या निर्देशामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवकालीन पाणी साठवण योजनेची कामे रोजगार हमी योजनेमध्ये घेण्यात यावीत, असे निर्देश केंद्र सरकारने १ एप्रिल २0१४ रोजी दिले होते. रोहयोमध्ये काम करण्यास मजूर मिळत नसल्याने ही सर्व कामे ठप्प झाली होती. यासंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी ७ जानेवारी रोजी आढावा बैठकीत लक्ष वेधले होते. त्याची तत्काळ दखल घेत खडसे यांनी विशेष बाब म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला. ९ जानेवारी रोजी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील शिवकालीन पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
साधारणपणे ६ ते १0 लाख रूपये खर्चाचा हा बंधारा त्या परिसरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी मोलाचा ठरतो. जिल्ह्यात असे बंधारे बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांनी टंचाई काळात टँकरग्रस्त असलेल्या गावांचीच निवड केली, त्यामुळे गेल्या वर्षभरात ४२ गावांची टँकरमधून मुक्ती झाल्याने या योजनेची व्याप्ती यावर्षी अधिक वाढविण्याचे नियोजन प्रशासनाचे होते; मात्र या योजनेची कामे रोहयोमधूनच करण्याची अट केंद्र सरकारने घातलेली आहे. ९ जानेवारी रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव यांनी बुलडाणा व जळगाव जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन दोन्ही जिल्ह्यातील शिवकालीन योजना राहेयोच्या अटीमधून मुक्त केली आहेत. आता ही कामे पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फत होतील.
टँकरमुक्तीचे जलसंधारण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच शिवकालीन योजनेच्या कामाला आणखी गती देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी स्पष्ट केले.