पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: May 16, 2015 00:51 IST2015-05-16T00:51:11+5:302015-05-16T00:51:11+5:30
पाच कोटींच्या कामांना तांत्रिक मंजुरी.

पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा
अकोला: शहरातील पोलीस कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी पाच कोटींच्या अंदाजपत्रकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७ मे रोजी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोला शहरात विविध ठिकाणी असलेली पोलीस कर्मचार्यांची शासकीय निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. या पृष्ठभूमीवर शहरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी ५ कोटींच्या कामांना शासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील पोलीस मुख्यालय, अनिकट, रामदासपेठ पोलीस ठाणे परिसरातील पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानांसह पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी सार्वजनिक बांधकाम अकोला विभागामार्फत अंदाजपत्रके तयार करण्यात आली. पाच कोटींच्या या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्याकडून ७ मे रोजी तांत्रिक मंजुरी देण्यात आली. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निविदा निश्चितीनंतर पोलीस कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मोडकळीस असलेल्या पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.