बनावट दस्तऐवजाद्वारे बँकेला दीड कोटींचा गंडा; तीन वर्षांनंतर रोखपालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:21 IST2018-06-17T14:21:26+5:302018-06-17T14:21:26+5:30
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली.

बनावट दस्तऐवजाद्वारे बँकेला दीड कोटींचा गंडा; तीन वर्षांनंतर रोखपालास अटक
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणातील आरोपी रोखपाल परमेश्वर बाबूलाल गावडे याला अटक करण्यात आली आहे.
रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह या बँकेची शाखा रामदास पेठ परिसरात आहे. २०१४ मध्ये या बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून बीड जिल्ह्यातील सुग्रीव खेळकर हे कार्यरत होते, तर रोखपाल म्हणून परमेश्वर बाबूलाल गावडे कार्यरत होता. व्यवस्थापक व रोखपालाने खातेदार अशपाक हुसेन रा. नायगाव याला सोबत घेऊन काही बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर या बनावट दस्तऐवजाद्वारे बँकेतून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम काढली. बनावट दस्तऐवज संगनमताने तयार करून ते खरे असल्याचे भासवून बँक प्रशासनाला २०१४ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. त्यांनतर रामदास पेठ पोलीस ठाण्यात बँक प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल चार वर्षांनी या फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींपैकी एक रोखपाल गावडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ करीत आहेत.