मुंडगाव शिवारात दरवळणार ओव्याचा सुगंध
By Admin | Updated: August 11, 2014 00:54 IST2014-08-11T00:30:14+5:302014-08-11T00:54:14+5:30
मुंडगाव परिसरातील शेतकर्यांचा कल आता ओवा पिकाकडे असल्याचे दिसून येत आहे.

मुंडगाव शिवारात दरवळणार ओव्याचा सुगंध
मुंडगाव: पावसाच्या लहरीपणामुळे मूग, उडीद पेरता आला नाही व सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे खारपाणपट्टय़ातील मुंडगाव परिसरातील शेतकर्यांचा कल आता ओवा पिकाकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडगाव शिवारात ओव्याचा सुगंध दरवळणार आहे.आकोट तालुक्यातील मुंडगाव हे ओवा या मसाला पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे; परंतु गत दोन ते तीन वर्षांपासून योग्य भाव व विक्रीसाठी निश्चित बाजारपेठ नसल्यामुळे या पिकाचा पेरा घटला होता. यावर्षी पावसाळय़ाचा जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस आला. तोपर्यंत मूग व उडिदाच्या पेरणीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचा पेरा केला. तथापि, पावसाचा अनियमितपणा, उगवण शक्तीत घट व वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. आता पुन्हा सोयाबीनची लागवड करणे परवडणारे नसल्यामुळे परिसरातील शेतकरी ओवा या मसाला पिकाकडे वळत आहेत. ओवा हे कमी पावसात येणारे पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत भावही बरे असल्यामुळे शेतकरी आता ओवा पीक पेरण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा मुंडगाव शेत शिवारात ओव्याचा सुगंध दरवळणार, एवढे मात्र निश्चित आहे. ओवा पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी अंदाजे १२ हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. या पिकाला वन्य प्राण्यांचाही उपद्रव नसतो. ऑगस्टमध्ये पेरणी केल्यानंतर साधारणत: जानेवारी महिन्यात हे पीक काढणीला येते.
एक हेक्टर क्षेत्रात अंदाजे १0 क्विंटल ओव्याचे उत्पन्न होते. उत्पादन खर्च अतिशय कमी असलेल्या पिकास योग्य बाजारभाव मिळाल्यास खारपाणपट्टय़ातील शेतकर्यांसाठी ते वरदान ठरून शकते.