अंडकोशावरील सुजेला दर्शविले फॅक्चर!
By Admin | Updated: January 29, 2016 00:03 IST2016-01-29T00:03:47+5:302016-01-29T00:03:47+5:30
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णाचे अजब निदान.

अंडकोशावरील सुजेला दर्शविले फॅक्चर!
अकोला: शाळेत खेळत असताना जमिनीवर कोसळून जखमी झालेल्या सात वर्षीय मुलाला सर्वोपचार रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये मुलाच्या अंडाकोशामध्ये सूज दिसून आल्यावर तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी अंडकोशावरील सुजेला फॅक्चर असल्याचे अजब निदान केले. यावरून सर्वोपचार रुग्णालयामध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. बालक, बालिका अदलाबदल प्रकरण, अंडकोशावरील सुजेला फॅक्चर असल्याचे निदान केवळ सर्वोपचार रुग्णालयातच घडू शकते. सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर म्हणून ओळखल्या जाते. हजारो गोरगरीब रुग्ण सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. याठिकाणी नेहमीच रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याच्या, चुकीचे निदान केल्याच्या घटना घडतात. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या कामचुकारपणाचा आणखी एक किस्सा बुधवारी समोर आला. १८ जानेवारी रोजी खदान परिसरातील सात वर्षीय मुलगा मोहम्मद एहतेशाम अब्दुल रज्जाक हा शाळेत खेळत असताना, अचानक खाली पडला. त्यात त्याच्या अंडकोशाला दुखापत झाली. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची सोनोग्राफी करण्यास सांगितले. एहतेशामच्या वडिलांनी रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागात सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये अंडकोशामध्ये फॅक्चर असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी एहतेशामवर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. वडिलांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर सिद्दिकी यांना दिली. त्यांनी मुलाची सर्वोपचार रुग्णालयातून सुटी घेतली आणि खासगी रुग्णालयात तपासणी केली. खासगी केंद्रावर सोनोग्राफी केल्यानंतर अहवालामध्ये अंडकोशामध्ये फॅक्चरऐवजी सूज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मुलांना घरी पाठवून दिले. आता मुलाची प्रकृती ठणठणीत आहे. सर्वोपचार रुग्णालयामध्ये मुलावर उपचार केले असते, तर तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी विनाकारण त्याच्या अंडाकोशावर शस्त्रक्रिया केली असती आणि मुलाच्या जीवावर बेतले असते, तर कोणी जबाबदारी स्वीकारली असती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.