३३ गावांसाठी चार पोलिस
By Admin | Updated: September 1, 2014 20:07 IST2014-09-01T20:07:43+5:302014-09-01T20:07:43+5:30
३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे.

३३ गावांसाठी चार पोलिस
सायखेड - बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा परिसरातील ३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. ३३ गावांसाठी केवळ चार पोलिस कार्यरत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांना कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाश्रीटाकळी अंतर्गत धाबा पोलिस चौकी आहे. या परिसरातील गावांचा कारभार या चौकीच्या भरवशावरच आहे. या ठिकाणी १५ कर्मचार्यांची गरज असताना अपुर्या संख्याबळामुळे केवळ चार जणांना येथे काम पहावे लागत आहे. या परिसरात चोर्या, मारामार्या आणि किरकोळ वादाचे अनेक प्रकरणे घडली आहेत. अनेक गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत. तपास रखडले आहेत. अशातच पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली कर्मचार्यांनी आपल्याकडील तपासातील प्रकरणे गुंडाळून ठेवली आहेत. तपास करायचा की गणपती बंदोबस्त करायचा ? हा प्रश्न या चार कर्मचार्यांसमोर उभा ठाकला आहे. चार कर्मचारी आपापल्या कामावर गेल्यानंतर चौकीला कुलूप असते. तक्रार देण्यासाठी कोणी आल्यानंतर त्याला येथे दिवसभर ताटकळत बसावे लागते. रात्रीच्या गस्तीवर येथे एकच कर्मचारी असतो. फार विचित्र स्थिती निर्माण झाली असताना पोलिस अधीक्षक या ठिकाणी कर्मचारी का वाढवित नाहीत? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.