‘फोर जी’चे काम बंद!
By Admin | Updated: August 5, 2014 00:54 IST2014-08-05T00:54:00+5:302014-08-05T00:54:00+5:30
फोर-जीसाठी शहराच्या विविध भागात रस्त्यालगत खोदकाम सुरू असून, जठारपेठ चौकातील सिमेंटचा रस्ता खोदल्यामुळे सदर काम बंद पाडण्यात आले.

‘फोर जी’चे काम बंद!
अकोला : फोर-जीसाठी शहराच्या विविध भागात रस्त्यालगत खोदकाम सुरू असून, जठारपेठ चौकातील सिमेंटचा रस्ता खोदल्यामुळे सदर काम बंद पाडण्यात आले. मनपाच्या करारात खोदकाम करताना सिमेंटच्या रस्त्यांचा समावेश नसतानादेखील कंपनीने चक्क सिमेंट रस्ता खोदण्यावर नगरसेवक अजय शर्मा यांनी आक्षेप नोंदवला. शिवाय खोदकामामुळे या भागातील जलवाहिन्या फुटल्या असून, त्या दुरुस्त न केल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट पसरल्याचे चित्र आहे. फोर-जी सुविधेसाठी रिलायन्स कंपनीने फायबर ऑप्टीक केबलचे जाळे पसरविण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. तसा करार मनपा प्रशासनासोबत झाला असून, या बदल्यात मनपाला १२ कोटी ९१ लाख ९0 हजार प्राप्त झाले. करारानुसार रस्त्यालगत खोदकाम होणार असून, ज्या रस्त्यांचे खोदकाम होईल ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंपनीवर निश्चित करण्यात आली. यामध्ये जलवाहिन्या, टेलिफोनची वायर आदींचादेखील समावेश आहे. जठारपेठ चौकातून खरोटे ज्वेलर्सकडे जाणारा सिमेंटचा रस्ता व होलीक्रॉस समोरील सिमेंट रस्ता खोदण्यावर या प्रभागाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आक्षेप नोंदवत काम बंद पाडले. करारात सिमेंट रस्त्यांच्या लगत कामकाज करण्याचे नमूद असताना, रस्ता खोदला कसा, तसेच मनपाने कंपनीसोबत केलेला करार संभ्रम निर्माण करणारा असल्याचा आरोप नगरसेवक शर्मा यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)