नाफेडकडे शेतकर्यांचे अडकले चार कोटी
By Admin | Updated: July 20, 2014 01:59 IST2014-07-20T01:06:30+5:302014-07-20T01:59:35+5:30
तुरीच्या चुकार्यापोटी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांचे नाफेडकडे सुमारे ४ कोटी रुपये अडकून पडले आहे.

नाफेडकडे शेतकर्यांचे अडकले चार कोटी
बुलडाणा : तुरीच्या चुकार्यापोटी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांचे नाफेडकडे सुमारे ४ कोटी रुपये अडकून पडले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांकडून नाफेडने ९६ लाख ७५५.२0 क्विंटल तुरीची खरेदी केली होती.
मागील खरीप हंगाम सर्वच शेतकर्यांना लाभदायी ठरला. अगदी वेळेवर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्यांनी पेरणीही वेळेवर केली. त्यानंतर झालेल्या पाऊस समाधानकारक व पुरेसा झाल्याने खरिपाची सर्वच पिके चांगली आली. सोयाबीन, कपाशी, उडीद मूग त्याबरोबरच तूर पिकांना चांगली झडती पडली. कधी नव्हे मागील हंगामात जिल्ह्यातील शेतकर्यांनी तुरीचा पेरा मोठय़ा प्रमाणावर केल्याने व पाऊसही चांगला झाल्याने तुरीच्या पिकाला कमालीची झडती पडली. त्यामुळे तुरीनेसुद्धा शेतकर्यांना चांगलाच हातभार लावला होता. तुरीचे उत्पादन बर्यापैकी झाल्याने साहजिकच व्यापार्यांनी तुरीचे भाव पाडले. त्यामुळे शेतकर्यांना अल्पदरात विक्री करावी लागली.
मात्र नाफेडने तुरीला प्रती क्विंटल ४,३00 रुपये हमी भाव जाहीर केल्याने शेतकर्यांनी आपला माल नाफेडला दिला. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ९६ लाख ७५५.२0 क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली. त्यापोटी ४१ कोटी ६0 लाख ४३ हजार ३६0 रुपये शेतकर्यांना देणे असताना आतापर्यंत ३६ कोटी ६९ हजार रुपयांचे चुकारे शेतकर्यांना केले. म्हणजे जवळपास ९0 टक्के चुकारे शेतकर्यांच्या झाले असले तरी आजही नाफेडकडे ४ कोटी ९६ लाख रुपयांचे पेमेंट देणे बाकी आहे.
*शेतकरी आर्थिक अडचणीत
चालू हंगामात पावसाने हुलकावणी दिली. तब्बल दीड महिना उलटूनही पाऊस नसल्यामुळे अद्याप पेरण्या झाल्या नाहीत. ज्या भागात शेतकर्यांनी धूळपेरणी केली तेथे आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अशातच जिल्हा बँक डबघाईस आल्याने यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक कर्जही मिळू शकले नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत शेतकर्यांना तडजोड करून पेरणीसाठी पैसा लावून ठेवावा लागला; मात्र सर्वच शेतकर्यांची परिस्थिती सारखी नाही. आलेल्या पिकावरच दुसर्या वर्षीच्या पेरणीचे नियोजन करावे लागत असल्याने अजूनही शेतकर्यांकडे पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे नाफेडकडून तुरीचे चुकारे न झालेले शेतकरी अर्थिक डबघाईस आलेले आहेत. ज्या शेतकर्यांनी सुरुवातीलाच नाफेडला तूर दिली त्यांचे चुकारे आले; पण उशिरा माल दिलेल्या शेतकर्यांना अद्यापही त्यांचा पैसा मिळाला नाही. हा पैसा लवकर मिळावा म्हणजे यावर्षीच्या हंगामातील पेरणीचे व इतर खर्चाचे नियोजन होईल, ही अपेक्षा शेतकर्यांना आहे.