वनविभागाच्या जंगलाचाही ‘सात-बारा’!
By Admin | Updated: January 20, 2015 23:45 IST2015-01-20T23:45:26+5:302015-01-20T23:45:26+5:30
प्राण्यांचा अधिवास, जंगलात मानवाच्या हस्तक्षेपासह सर्वच बाबींची माहिती.

वनविभागाच्या जंगलाचाही ‘सात-बारा’!
सचिन राऊत / अकोला - प्रादेशिक वनविभाग, वन्यजीव विभाग आणि वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जंगलांचा सात-बारा तयार करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मालमत्तेची संपूर्ण माहिती सात-बारावरून मिळते, तशाच प्रकारे जंगलांची संपूर्ण माहिती या सात-बारावर राहील. यामध्ये प्राण्यांच्या अधिवास ठिकाणांचे अक्षांश-रेखांश, वनाचा प्रकार, वनाची घनता यांसह मानवाचा हस्तक्षेप या बाबी नोंदवल्या जाणार आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
वनविभाग, वन्यजीव विभाग आणि वनविकास महामंडळाच्या जंगलांमध्ये या आधी केवळ वाघांची गणना करण्यात येत होती; मात्र जानेवारी २0१४ मध्ये राज्यातील संपूर्ण वनविभागाच्या जंगलांमध्ये नव्या पद्धतीने गणना करण्यात आली. यासाठी नवीन आणि वेगळ्याच पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निर्धारित वनक्षेत्रात आढळलेल्या तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची गणना तर केलीच, शिवाय वनक्षेत्रातील वनस्पती, जमिनीवरील वनाच्छादन, झाडोरा, जंगलात मानवी हस्तक्षेप किती प्रमाणात आहे, याची नोंददेखील घेण्यात आली आहे. तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेचा अभ्यास याचा नव्या पद्धतीत समावेश करण्यात आला. ही संपूर्ण माहिती वनविभागाकडून संगणकावर अद्यावत करण्यात येणार आहे.
जानेवारी २0१४ मध्ये जंगलाच्या सात-बारासोबतच संपूर्ण जंगलांचे निरीक्षण करण्यात आले असून, त्याचे संगणकाद्वारे विश्लेषणाचे काम अंतीम टप्प्यात आहे. जीपीएस प्रणाली सोबत ठेवून एका प्रपत्रात ही माहिती भरण्याचे कामकाज करण्यात आले आहे. या प्रपत्रामध्ये प्राण्यांच्या अधिवास ठिकाणाच्या वनाची घनता, भूप्रदेश, हवामान याची माहिती घेण्यात आली आहे. जंगलाच्या परिसरातील चराई करणारे, गुराखी व इतर गवतांचे प्रकार, लहान वनस्पती, पालापाचोळा, तृणभक्षी प्राण्यांची विष्ठा याची नोंद घेण्यात आलेली आहे.