महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड
By सचिन राऊत | Updated: September 25, 2023 19:41 IST2023-09-25T19:40:51+5:302023-09-25T19:41:01+5:30
हिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांची दिशाभूल करीत जबरी चोरीचा स्वतःच बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले़

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड
अकाेला : महिला वैद्यकीय अधिकारी रविवारी रात्री उशिरा अकोट फाईल परिसरातून घराकडे येत असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम मोबाईल व साहित्य लंपास केल्याची तक्रार अकोट फाईल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला असता महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःच जबरी चोरीचा बनाव रचल्याचे साेमवारी तपासात उघड झाले आहे.
शहरात रहिवासी असलेली व वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने २४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या मोपेड गाडीने घराकडे परतत असताना अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्याकडील रोख सहा हजार रुपये, एक कंपनीचा मोबाईल व साहित्य असा ऐकून २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरटयांनी पळविल्याची तक्रार अकोट फाईल पोलीस ठाण्यात दिली होती़ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी केला असता व विविध पथकाद्वारे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांची दिशाभूल करीत जबरी चोरीचा स्वतःच बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले़
या संदर्भात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणखी कसून चौकशी केली असता मोबाईलसह सर्व साहित्य त्यांच्याकडेच असल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.