चेलका येथील जलस्वराज व्हेंटीलेटरवर
By Admin | Updated: May 14, 2014 19:37 IST2014-05-14T18:12:52+5:302014-05-14T19:37:56+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका येथील गावकर्यांची पाण्यासाठी भटकंती

चेलका येथील जलस्वराज व्हेंटीलेटरवर
सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका येथील जलस्वराज योजना सध्या व्हेंटीलेटरवर असून, इलेक्ट्रिक मोटारपंप नादुरुस्त आहे. विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित असून, ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना शेतातील विहिरींकडे धाव घ्यावी लागत आहे. या गावातील जलस्वराजची विहीर केवळ देखावा असल्याचे दिसते. विहिरीवरील मोटारपंप जळाल्याने सदर साहित्य भग्नावस्थेत पडलेले दिसून येते. विहिरीतील पाण्याचा अनेक दिवसांपासून उपसा न झाल्यामुळे त्यात शेवाळ साचलेले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी भरण्यासाठी पहाटे ४ वाजतापासूनच महिलांना १ किमी अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीवर जावे लागते. ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.