फुलशेतीतून फुलविले हास्य!
By Admin | Updated: October 1, 2014 13:40 IST2014-10-01T13:39:45+5:302014-10-01T13:40:23+5:30
अथक परिश्रम आणि जोखीम पत्करण्याची तयारी असली, तर एखाद्या लहानग्या गावातील महिलाही प्रगतीची शिखरे पादाक्रांत करू शकते, याचा प्रत्यय मूर्तिजापूर तालुक्यातील एका महिला शेतकर्याच्या प्रवासातून येतो.

फुलशेतीतून फुलविले हास्य!
सातवी माळ - नेतृत्व : कृषी क्षेत्रातील क्रांतिदूत अन् शेतकर्यांची मार्गदर्शक
विवेक चांदूरकर■ अकोला
जिद्द, अथक परिश्रम आणि जोखीम पत्करण्याची तयारी असली, तर एखाद्या लहानग्या गावातील महिलाही प्रगतीची शिखरे पादाक्रांत करू शकते, याचा प्रत्यय मूर्तिजापूर तालुक्यातील एका महिला शेतकर्याच्या प्रवासातून येतो. फुलशेती करणे हे सधन शेतकर्यांचेच काम आहे, हा समज या महिलेने खोडून काढला. अतिशय विपरीत परिस्थितीत फुलशेतीचा प्रयोग यशस्वी करणारी ही महिला, आजमितीस अन्य शेतकर्यांना फुलशेतीचे धडे देत त्यांना मार्गदर्शनही करीत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा या लहानशा गावात राहणार्या हर्षा गणेशपुरे यांची परिस्थिती १0 वर्षांपूर्वीअतिशय गरिबीची होती. चार एकर शेती आणि लहानशी झोपडी, एवढेच या कुटुंबाचे विश्व; मात्र अशा बिकट परिस्थितीतूनही हर्षाने यशाचा मार्ग शोधला. २00२ साली त्यांनी पहिल्यांदा फुलशेती करण्याचे धाडस केले. त्या वेळी केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हेतर, संपूर्ण पश्चिम वर्हाडात फुलशेती करणार्या त्या एकमेव महिला शेतकरी होत्या. फुलशेतीत जोखीम जास्त असल्याने, हा व्यवसाय करण्यास कुणीच धजावत नव्हते; मात्र हर्षा गणेशपुरे यांनी अथक परिश्रमाच्या बळावर हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सुरुवातीला त्यांनी अध्र्या एकरावर लिलीची रोपेलावली.
पहाटे ४ वाजता शेतात जाऊन फुले तोडणे, ऊन असताना फुलांच्या झाडांची निगा राखणे आणि सायंकाळी पुन्हा फुले तोडणे, असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांचे पती अमरावती आणि अकोल्याच्या बाजारपेठेत फुलांची विक्री करायचे. अवघ्या दोन ते तीन वर्षांतच त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण चार एकरात फुलशेती सुरू केली. पाहता-पाहता लिली, झेंडू, ग्लॅडियल आणि गुलाबाची फुले त्यांच्या शेतात डोलू लागली. उत्पन्न वाढल्याने हळूहळू आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली. त्यामुळे या धाडसी प्रयोगाचा आधी ऊपाहास करणार्या गावातील अन्य शेतकर्यांनीही त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. या शेतकर्यांना फुलशेतीसाठी बीजपुरवठा करण्यापासून तर, पेरणी आणि फुलविक्रीपर्यंत सर्वच बाबतीत त्या मार्गदर्शन करीत असतात.
आता अमरावतीच्या बाजारपेठेत गणेशपुरे यांच्या फुलांची वेगळी ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या फुलांना विशेष मागणी असते. आजमितीस त्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्या तरी, पूर्वीच्या परिस्थितीचे विस्मरण त्यांना झाले नाही. म्हणूनच गरीब व होतकरू शेतकर्यांना फुलांच्या रोपांचे बियाणे त्या कमी किमतीत किंवा वेळप्रसंगी मोफतही देतात. त्यांच्या प्रेरणेने शेतकरी फुलशेती करायला लागले आहेत. उद्याची माळ : कला जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित
हर्षा गणेशपुरे यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत फुलशेतीचा प्रयोग यशस्वी करून अन्य शेतकर्यांना फुलशेतीचे धडे दिले. शेती व्यवसायातील योगदानाबद्दल राज्य शासनाने त्यांचा जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मान केला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुणे येथील राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या त्या सदस्य असून, डॉ. पंजाबराव देशमुख विद्या विस्तार शिक्षण परिषद, जिल्हा आत्मा समिती आणि अकोला कृषी विज्ञान केंद्राच्याही त्या सदस्य आहेत. केवळ राजकारणातच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही महिला स्वावलंबी होतानाच नेतृत्वही करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.