बंडखोरीमुळे लढत पंचरंगी
By Admin | Updated: October 2, 2014 01:52 IST2014-10-02T01:52:05+5:302014-10-02T01:52:05+5:30
मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात.

बंडखोरीमुळे लढत पंचरंगी
मूर्तिजापूर (अकोला) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार असल्याचे दिसत आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात बुधवारी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा अवचार व भारिप-बमसंचे संदीप सरनाईक यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये बंडखोरी झाली आहे. मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे हरीश पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुधीर विल्हेकर, काँग्रेसचे श्रावण इंगळे, शिवसेनेचे महादेव गवळे, भारिप-बमसंचे राहुल डोंगरे तसेच बसपाचे अरुण बांगरे, मनसेचे रामा उंबरकार व इतर उमेदवारांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असले तरी, प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं, शिवसेना इत्यादी पाच पक्षांच्या उमेदवारांमध्येच पंचरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. मनसे, बसपा बहुजन विकास आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आंबेडकराईट रिपब्लिकन पार्टी व अपक्ष उमेदवारांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र आहे.