दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब
By Admin | Updated: May 25, 2017 21:00 IST2017-05-25T20:20:16+5:302017-05-25T21:00:17+5:30
वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता, कंत्राटदाराचा प्रताप

दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : येथून जवळच असलेल्या कोळंबी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या दीड एकर शेतात वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराने शेतकऱ्याची पूर्वपरवानगी न घेता पाच विजेचे पोल रोवून समोरील शेतकऱ्यासाठी वीज नेली. ही लाइन नेत असता विजेचे खांब शेताच्या धुऱ्यावरून नेले असते तर शेतकऱ्याने मनाई केली नसती; परंतु दीड एकरात मधोमध पाच विद्युत पोल रोवल्यामुळे या शेतकऱ्याला शेती वहितीसाठी अडचण जात असून, शेतकऱ्याने नुकतीच या गंभीर प्रकाराची तक्रार जिल्हा अधिकारी यांना दिली आहे.
प्रमोद महादेवराव उमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराने शेतीच्या मधोमध पाच खांब गाडले आहेत, त्यामुळे शेती मशागतीसाठी अडचणी येत आहेत. याप्रकरणी वीज वितरणसह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या खरीप हंगामासाठी मशागतीची कामे सुरू आहेत. या खांबांमुळे मशागतीसाठी अनेक अडचणी येत आहेत. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे; परंतु वीज वितरण व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे या शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून, शेती वहिती करणे कठीण झाले आहे. शेती पिकविली नाही, तर कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, याची चिंता तक्रारकर्ता शेतकऱ्याला लागली आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असूनसुद्धा हा शेतकरी मानसिकदृष्ट्या खचून गेला असून, या प्रकरणाची त्वरित दखल घेण्याची मागणी प्रमोद उमाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.