पेट्रोल पंपांवर रक्कम काढण्याच्या सुविधेचा पहिला मान अकोटला!
By Admin | Updated: November 19, 2016 01:43 IST2016-11-19T01:43:59+5:302016-11-19T01:43:59+5:30
२४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपांवर ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश.

पेट्रोल पंपांवर रक्कम काढण्याच्या सुविधेचा पहिला मान अकोटला!
अकोला, दि. १८- देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर ठरावीक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. या सुविधेंतर्गत देशातील काही ठरावीक पेट्रोल पंपांवर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. त्याचबरोबर २४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपांवर ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएमबाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.
राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सर्वात पहिल्यांदा अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येथे झाली असून, अकोटवासीयांना रकमेचे वाटप सुरू झाले आहे. अकोट शहरातील अकोला मार्गावरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. संध्याकाळी अकोला येथील राठी यांच्या पेट्रोल पंपावरसुद्धा ही सुविधा सुरू झाली आहे. या निर्णयाने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ५00 आणि १000 च्या नोटांवर बंदीनंतर बँकांमधील गर्दी दहा दिवसानंतरही कमी होण्याचे नाव घेत नाही. सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी आता पेट्रोल पंपांची मदत घेण्याचे ठरविले. बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर ठरावीक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. याअंतर्गत देशातील काही ठरावीक पेट्रोल पंपांवर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. सुरुवातीला अडीच हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा असणार आहे. त्यानंतर जवळपास २0 हजार पेट्रोल पंपांवरही पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.