जनतेच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य!
By Admin | Updated: May 10, 2017 07:22 IST2017-05-10T07:22:10+5:302017-05-10T07:22:10+5:30
जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रपरिषदेत त्यांनी संवाद साधला.

जनतेच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य!
अकोला: पोलीस हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून जनतेला तातडीने प्रतिसाद मिळायला हवा. त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण बजावू. त्यातही जनतेची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पोलिसांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यावर आपला भर राहील, असे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कलासागर यांनी सोमवारी रात्री पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. अकोल्यात बदली होण्यापूर्वी आपण जिल्ह्याची माहिती घेतली. अकोला शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणं संवेदनशील असल्याची माहिती आपल्याला मिळाली. माझ्या कार्यकाळात जिल्ह्यात शांतता नांदून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी आपण प्रयत्न करू. काम करताना कोणाचाही मुलाहिजा करणार नाही.
जनतेच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपण भर देऊ. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बसविलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी, त्यांनी निर्माण केलेला वचक कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी, गुन्हेगारी कशी नियंत्रित राहील आणि गुन्हे सिद्धी कशी वाढेल, यादृष्टिकोनातून आपण काम करू. काम करताना, जनतेला डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करू.
प्रथम प्राधान्य जनतेला राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला शहर मला नवीन आहे. शहर व जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या उपाययोजना करायच्या, कोणते निर्णय घ्यायचे, हे निश्चित करून आपण काम करू, असेही कलासागर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस निरीक्षक प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते.