फटाके उठले जीवावर
By Admin | Updated: October 18, 2014 00:40 IST2014-10-18T00:40:59+5:302014-10-18T00:40:59+5:30
अकोल्यात नियमांची पायमल्ली करुन गल्ली-बोळात, चौका-चौकात फटाक्यांची दुकाने.

फटाके उठले जीवावर
अकोला : निवडणुकीच्या धामधुमीनंतर दिवाळीची चाहूल लागली असून, शहरात सर्वत्र बाजारपेठ गजबजली आहे. रंगीबेरंगी वस्त्र, आकाश कंदीलसोबतच फटाक्यांची दुकानेही ठिकठिकाणी सजली आहेत. मनपाने फटाके विक्रेत्यांना विक्रीसाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानाची जागा दिली असल्यावरही शहरातील गल्ली- बोळात, चौका-चौकात फटाक्यांची विक्री करण्यात येत आहे. ही नियमांची पायमल्ली असून, यामुळे अघटित घटना घडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हय़ात दरवर्षी अंदाजे दोन कोटींच्या वर फटाक्यांचा धुव्वा उडविला जातो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हय़ात ५८३ जणांना, तर अकोला उपविभागात ३३४ जणांना फटाके विक्रीचा अधिकृत परवाना दिला आहे. महानगरपालिकेने शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाची जागा फटाके विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच कोणते फटाके विकावे, याचे नियमही ठरवून दिले आहेत; मात्र दिवाळीमध्ये अनेक नागरिक फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. शहरातील गल्ली बोळात, घरासमोर खाट टाकून तसेच चौका-चौकात दुकाने सुरू करून फटाके विक्री करण्यात येते. यामुळे केव्हाही अघटित घटना घडण्याची शक्यता आहे. मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनासह अन्य सुविधा असतात. अन्यत्र मात्र कोणत्याच सुविधा नसतात. त्यामुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकृत परवाना असलेल्या दुकानदाराकडून मनपाने ठरवून दिलेल्या जागेवरूनच फटाके खरेदी करण्याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. कारण यातच नागरिकांचे आणि संपूर्ण गावाचे भले आहे. अनधिकृतपणे फटाके विकणार्यांना नागरिकच चाप लावू शकतात. त्यासाठी नागरिकांनी दक्षता पाळणे आवश्यक असून जागृती गरजेची आहे.