मोताळा, डोणगाव येथे आगीत दुकाने खाक!
By Admin | Updated: November 13, 2015 01:56 IST2015-11-13T01:56:18+5:302015-11-13T01:56:18+5:30
आग लागून कापड दुकान खाक; लाखोचे नुकसान.

मोताळा, डोणगाव येथे आगीत दुकाने खाक!
मोताळा (जि. बुलडाणा) : येथील आठवडी बाजार परिसरातील चुन्नु-मुन्नु ड्रेसेस या किड्स वेअरला ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्यासह संपूर्ण कपडे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे वीस लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज दुकानमालक कैलास धिरबस्सी यांनी व्यक्त केला आहे. नांदुरा रोडवरील आठवडी बाजार परिसरात असलेल्या कैलास सीताराम धिरबस्सी तरोडा ता. मोताळा यांच्या चुन्नु-मुन्नु ड्रेसेस (किड्स वेअर) या दुकानाला ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. दिवाळीचा हंगाम असल्याने सदर व्यापार्याने मोठय़ा प्रमाणात खरेदी केलेली होती. आग लागताच काही क्षणातच दुकानातील कपडे व लाकडी साहित्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे दुकानातील सर्व साहित्य, फर्निचर, सब मीटर व कपडे जळून खाक झाले. दरम्यान, कपडे जळण्याच्या वासावरून ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच शंकर मशीनरीचे मालक, रामेश्वर खंडागळे, सिमेंट हाऊसचे जुबेर शेठ, राजू मॅकेनिक आदींनी मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर दुकानाचे शटर बंद असल्याने आग विझविण्यासाठी मोठी अडचण आली होती. त्यामुळे राजू मॅके निक (कोथळी) ने दुकानावरील टीनपत्रे तातडीने काढून सहकार्यांंच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केलेत. पहाटे ४:३0 वाजेपर्यंंत आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने या दुकानाला लागून असलेल्या इतर दुकानांना आगीची बाधा पोहोचली नाही व पुढील अनर्थ टळला. बोराखेडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी वनारे व पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.