गाड्यांचे सुटे भाग विकणा-या दुकानाला आग
By Admin | Updated: May 11, 2015 02:29 IST2015-05-11T02:29:12+5:302015-05-11T02:29:12+5:30
अकोल्यातील गांधी रोड वरील दुकानाला आग; लाखोंची हानी, स्टुडिओही जळून खाक.

गाड्यांचे सुटे भाग विकणा-या दुकानाला आग
अकोला - गांधी रोडवरील अकोला नॅशनल गॅरेज गाड्यांचे सुटे भाग विकणार्या या दुकानाला व त्यावरील फिल्मको नामक स्टुडिओला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. गांधी रोडवर असलेल्या अकोला नॅशनल गॅरेज व फिल्मको स्टुडिओला रविवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीची माहिती तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाचे पाच बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले; मात्र विद्युत पुरवठा खंडित होईपर्यंत आग न विझविण्याचा निर्णय अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी घेतल्याने आग मोठय़ा प्रमाणात वाढली. एका तासानंतर विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; मात्र तोपर्यंत या दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. अकोला नॅशनल गॅरेज सोबतच फिल्मको स्टुडिओतील साहित्यही जळाले असून, दोन्ही दुकानातील तब्बल १0 ते १२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.