निराट-वैराट येथे आग : पाच गोठे भस्मसात
By Admin | Updated: May 13, 2017 18:49 IST2017-05-13T18:49:44+5:302017-05-13T18:49:44+5:30
आगीत पाच गोठे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

निराट-वैराट येथे आग : पाच गोठे भस्मसात
चारा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक
बोरगाव वैराळे : अकोला तालुक्यातील निराट-वैराट गावात अचानक भरदुपारी १२.३0 ते १ वाजताच्या दरम्यान आग लागली. या आगीत पाच गोठे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
निराट-वैराट येथे शनिवारी आग लागून सुरेंद्र हरिभाऊ रेंगे यांचे राहते घर भस्मसात झाले. घरातील संपूर्ण अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले. त्यामुळे, त्यांचे जवळजवळ एक लाख रुपयाचे नुकसान झाले. यासोबतच दिनकर पिंजरकर, सुनील परनाटे, दिनकर घाटे, अनंतराव पिंजरकर, समाधान पिंजरकर, शालीग्राम घाटे यांचे गुराचे गोठे या आगीत जळून खाक झाले असून, गोठय़ातील गुरांसाठी लागणारा चारा कडबा, कुटार तसेच शेती उपयोगी साहित्य वखर, डवरे, पेरणीसाठी लागणारे तिफण, सरते असे जवळजवळ दोन लाख रुपये किमतीचे साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने हे शेतकरी पेरणीचा हंगाम काही दिवसावर येऊन ठेपल्याने संकटात सापडले आहेत.
निराट-वैराट गावाला आग लागली. त्यावेळी वीज पुरवठा खंडित असल्याने आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही. तसेच अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण केले असता, दीड तास उशिराने गावात दाखल झाले. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. सुदैवाने यावेळी हवा नसल्यामुळे मोठी हानी टळली. गावातील प्रत्येक व्यक्ती घरात आहे तेवढे पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होता. येथील सरपंच सुनील परनाटे, ग्रामसेवक राजीव गरकल, तलाठी ढोरे यांनी पूर्णा नदीवरून गोपाळराव परनाटे यांनी वीटभट्टीसाठी घेतलेल्या पाण्याची पाइपलाइन आग लागलेल्या ठिकाणी आणून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी राजू परनाटे, प्रभुदास शेंगोकार, प्रदीप परनाटे, वसंतराव परनाटे, अक्षय इंगळे यांच्यासह गावातील सर्वच नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. (वार्ताहर)